भेटीने उमलल्या कळ्या
उठले तरंग
पंचरंगी
रंगीबेरंगी उडती पतंग
आंगोपांगी
सुसंगाचे वेगळ्या ढंगांचे
जिणे आपले कलावंतांचे
निळ्या नभातल्या
नितळ भावना जागवायचे
भेटीने उमलल्या कळ्या
झळाळल्या फुलझड्या
सुगंधित ह्या
जिव्हाळ्याच्या पाकळ्या
भेटीचा दिला मला मान
हा सन्मान
छातीवर मिरवीन हा अभिमान
भेट नव्हती पहिली
इतके सहज शब्द
अलगद आले ओठांत
कलात्मकता अंतर्बाह्य
शब्दांची ही कलाकुसर
तुझ्या परीघात
तू प्रज्ञामुखी
सर्जनसुखी
दुःखाची सखी
वेदनेला नाहीस अनोळखी
तुझ्या भेटीत
मी भारलो
भरलो शिगोशीग
भारावून गेलो
भरजरी सहवासात
भरदार भक्कम झालो...
-मोहन शिरसाट ,वाशीम
mohan.shirsat@gmail.com
No comments:
Post a Comment