Saturday, 6 July 2019

Tuesday, 4 June 2019

माझ्या सहा कविता

माझ्या सहा कविता

❄️❄️❄️❄️❄️

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे
असं चित्र जे बसत नाही
कोणत्याही एकाच फ्रेममध्ये..

असा झरा
जो निखळ वाहणारा
हृदयापासून हृदयापर्यंत...

असं सत्त्व
जे वाहणारं झाडाच्या मुळांतून
उंच माथ्यापर्यंत ..

अशी लहर
जी अथांग सागरातून लाट बनून
विसावणारी किनार्‍यावर ..

असा मकरंद
ज्यासाठी फुलानं आपलं सारं आयुष्य
सत्कारणी लावलेलं...

असा मोती
जो आयस्टरचं दुःख
आपल्या पोटात असुनही चमकतो

प्रेम म्हणजे
असा श्वास
जो चराचरांमध्ये प्राण
तेवत ठेवतो अविरत..

           
       -मोहन शिरसाट ,वाशीम
        mohan.shirsat@gmail.com
        भ्रमणभाष -9421051823


आठवणींचा आठवला शेला

कालचा दिवस बीझी गेला 
तुझ्या आठवणींचा आठवला शेला

जाग आली सकाळी सकाळी
आठवणीच्या गजराने 
तन मन झाले जागे 
आठवणीच्या किलबिलाटाने

वाॅकींगला सरत्या रस्त्याला
घेतले आठवणीच्या कवेत
आठवणीतच श्वासउच्छासाचा सराव
पहाटेच्या मस्त हवेत .

गप्पांमध्ये नव्हते लक्ष
आठवणींचं वारं भरताना
आठवणींचा ज्वर चढाच
घराच्या पायर्‍या चढताना

आठवणींच्या गाठी उकलल्या
बुटाची लेस सोडताना .
चहाची चव भारीच
तंद्रीत भुरके घेताना

आठवणी आठवणीतच 
नुसताच आठवण काढत
अंघोळ न करताच बसलो
आठवणींची समाधी लावत .

आठवणींच्या साबणाचा फेस 
आला आतून शरीरभर 
आठवणीतच फ्रेश झालो 
ताजेतवाने वाटले मनभर

दारातले वर्तमानपत्र 
अलगद आले हातात 
आठवणींच्याच हरेक 
बातम्या हरेक पानांत

मंद स्मित हसर्‍या बोलात
आठवण पुढे सरकली
वार्‍याच्या सहवासात
आठवणींची पानं टवटवली

थोडी टंगळ मंगळ करताना 
सरकली उगीच वेळ पुढे
गाणी गोष्टीत गुंततानाही
जीव असा तुझ्यातच ओढे

दिवसभर तुझीच आठवण 
चघळत होतो मनात 
विरघळतही नव्हती 
सहज लगेच क्षणात

आठवणींची भर भरता
हळूच येते सरीवर सर
संकोचणार्‍या झाडाला 
तुझ्या आठवणींची भर

आठवणी आठवणीतच
दिस सरला रात्र उरली 
आठवणीची झालर मात्र
मंद मंद झुलतच राहिली 

आठवणींना नाही वास
जातीचा-धर्माचा वा प्रदेशाचा
सुवासच आहे चित्तात
आठवणींच्या साग्र संगीताचा

ही आठवण आहे 
शाळेतल्या किशोरावस्थेची
तुझ्या आकर्षणाच्या नादात
सुस्ताळलेपण जाऊन आलेल्या हुशारीची

कालचा दिवस बीझी गेला 
तुझ्या आठवणींचा आठवला शेला

     -      मोहन शिरसाट
आय.यु.डी.पी.काॅलनी ,वाशीम 444505
mohan.shirsat@gmail.com


तू घडी विवेकाची

तुझ्या बालपणाची घडी बिघडलीय
संसाराच्या ओझ्याखाली

अवखळलंय तारूण्याचं सळसळणं
इच्छांचे सोनेरी किरणं अडवले गेलेत ह्या समाजव्यवस्थेच्या पडद्यांनी

मन चंचल बनवावं लागलं
अचल भावनेत अडखळत

बंधनांचे काटे बोचत राहिले सतत
पण या अडथड्यातून
तुझी महत्वाकांक्षा आली कवच चिरून

तुझे आकाश मागितले तू जोरकसपणे
तुझे आकांक्षा चेतवल्या तू ताकदीने
तुझे तुला पेटवून घेतले तू अंतर्बाह्य

तशी मिळविलीस तुझी तू स्पंदणे
स्वतःचा श्वास स्वतः घेत राहिलीस
स्वतःचं सत्त्व स्वतःच मिळवलं
करवून घेतलंस स्वतःच्या माणसांना आपलंस

भोवतालच्यांना पटवून
फुलविलास पिसारा तू ह्या ज्ञानदेही
आणि झालीस प्रज्ञामयी

तू घडी आहेस सतत टिकटिकणारी
थांबणे तुझ्या स्वभावात नाहीय

चालण्याची ऊर्जा तुझी तूच  होते
म्हणून तुला हवेय तुरंत सगळे
तात्काळ हवा जबाब

तुझ्या नसानसांतल्या घड्याळी काट्यांना
नसते उसंत थांबायला
तुला हवं ते मिळवायला
तू असतेस अधिर
बधिर नसतातच तुझी गात्र

सतत जागं असते भान
असं जगणंच तुझी आहे शान
पण आता ही ऊर्जा
लावावी सर्जनाच्या ठायी
म्हणून विवेकाचा गजर असू दे तुझ्या पायी.

 -      मोहन शिरसाट
आय.यु.डी.पी.काॅलनी ,वाशीम 444505
mohan.shirsat@gmail.com


मज आवडतो

मज आवडतो
समुद्राचा अथांगपणा
वाळूचा मऊशारपणा
लाटांचा अवखळपणा
पावसाचा अल्लडपणा

भक्कम झाडांचं डोलणं
हिरव्या रानात रमणं
ओल्या मातीचा गंध
हास्य गालातलं मंद

स्निग्ध बोलाची साय
पाऊसधारातला गरम चाय

अजून काय आवडते सांगू तुला ?
शब्द मधाची चव ताजी
वल्हव मनाची नाव राजी

फुलांचं फुलणं
नभाला भीडणं
नदीशी बोलणं
पक्षांचं विहरणं

मनोमन मनात स्वतःशीच झगडणं
माणूसकी जगवणार्‍यांना जीवापाड जपणं
भोवतालातल्या भिन्नांना
सकारात स्वीकारणं

अशीच आवड सांगत जाऊ किती
पराभवाला सांगू  'जिद्द हाय जीती !'
आवडते मला......
    
        -मोहन शिरसाट,वाशीम
       mohan.shirsat@gmail.com
     भ्रमणभाष-9421051823


पुरूष म्हणून केलेल्या अन्यायाची कबुली .

कबुल मला ,
अधून मधून जागा होतो माझ्यातला पुरूष .
कळतही नाही मला की ,मी पुरुष म्हणून
तुझे मनगट कधी पिरगाळले म्हणून !
पाठीवर थाप क्कचित पडते तुझ्या ,
पण पाठीवर वळ उठण्यासच
कारणीभूत ठरतो मी .
चटक्यांचीच भाषा तुला कळतेय
असंच वाटते मला नेहमी.
रटन्या घटन्याच्या तुझ्या आयुष्यात
रट्टेच हवेत तुला, त्याशिवाय बस्सर नाही जात
तुझी बाईची जात .
बाई वरचढ म्हणजे
तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या.
तू बाईमाणूस असूनही तुझ्यातला
'माणूस' दडवलाय मी स्वतःकडे वळवलेल्या चार बोटात.
तुलाही मन असते हे माझ्या ध्यानी मनीच नसते .
तुलाही भावना असतात
हे मला कधी भावतच नाही .
तुझं ममत्व महत्वाचं नसून
तू मांडलिकच असावी माझ्या मांडीखालची.
माझी नजर जरी भिरभिरली सगळीकडे
तरी तुझी नजर माझ्याच देहावर खिळवून रहावी ,
असाच खेळ खेळतो तुझ्याशी बारहम्मेस .
ठिबकत राहतो सत्तेचा माज माझ्या आतून.
आटतच नाही माझा पुरूषी बाज अंगातून.
पिडागुहेतले नुसते शिल्प बनवून शो -पिस
म्हणूनच सजवलं धजवलं तुला .
उंबरठ्याबाहेर जाणारे बाहू कापले जरी असले
तरी दिवाणखाण्यात खांद्याला खांदा भीडवून
नक्षीदार फ्रेम हवी तुझ्यासवे .
खरंच ग ,
हा काळाचा पडदा बाजूला केला तर
अनंत अंधारच आहे तुझ्यावर आजपावेतो .
म्हणूनच  ही जाहीर कबुली देतोय
तुझ्या समक्ष साक्ष ठेऊन
'पुरूष म्हणून केलेल्या अन्यायाची !
( नाही फिरलो माघारी' या कवितासंग्रहातून )
     -मोहन शिरसाट ,वाशीम
        mohan.shirsat@gmail.com
        भ्रमणभाष -9421051823

६.
#चारोळ्या


नाकात नथनी
गळ्यात सोन्याची माळ

मनात मोहिनी
लावण्याचा उठला जाळ ।


मैत्री जुळली
साय दुधाची जशी
मधाळ खुशी


फुलांचे सृजन
मनीचे गुंजन
साद घाली मला ।

पाकळ्या कांचन
हृदयी साजन
हाक देई मला ।


हृदयी कळी म्हणाली
संगाचे धुमारे जपावे ।

मनाशी नातं जोडून
स्नेहाचे अंकुर जपावे ।


आपण राहू मनोमनी
समीप एकमेका ।

आपण साहू पानोपानी
सांभाळू जनलोका ।


डोई भार सतत
तोल सांभाळताना ।

मी ग लई गुंतले
नात्यांना जपताना ।


अशीच वीज अमोल
अक्षरात नाचावी
शब्दांत मळावी
भिनून
मुरावी
चमकत लकाकावी
अंतरात खोल ओल

✨✨✨✨✨

Saturday, 1 June 2019

अभिप्राय


*नाही फिरलो माघारी/ग्रंथाली प्रकाशन,मुंबई*
या माझ्या कवितासंग्रहावरील *निवडक अभिप्राय*
१.
मोहनची कविता दलित-आंबेडकरी जाणिवांच्या संयत आशयाभिव्यक्तीच्या परिप्रेक्ष्यात सृजनशील असुनही ती बुद्ध-आंबेडकरांच्या सर्वहारा माणसांच्या शोषणमुक्तीचा व दुःखमुक्तीचा विचार केंद्रस्थानी मांडते.(*आगामी ग्रंथातून*)
                         *डाॅ.किशोर सानप,नागपूर*
                                   सुप्रसिद्ध समीक्षक 
२.
जागतिकीकरणाच्या वर्तमानी भूमिवर समकालिन पसार्‍यात अस्वस्थ करणारा जात वास्तवाचा टोकदारपणा अधोरेखित करताना भोवतालात वाढत जाणार्‍या काटेरी भूमीवर विचारांचे कोंभ रूजविण्याचा आटोकाट प्रयत्न मोहन शिरसाट यांच्या कवितेने केला आहे.(*प्रस्तावना*)
                            - *प्रा.डाॅ.महेंद्र भवरे*
                                कवी व समीक्षक
           मराठी विभाग,मुंबई विद्यापीठ
३.
ज्यात एकूण शोषितांच्या वेदना आहेत।भाऊ राबतो शेतात या कवितेत मांडलेल्या वेदना ह्या कुणबीवेदना आहेत।पिकच पिकाला खाऊन टाकते,हे तुम्हाला कळते।ही किती उत्तम बाब।धरणीचे प्रारूप तुम्हीं यातून मांडताय। *तुमची कविता सहज संवादी आहे*
                         - *श्रीकांत देशमुख*,नांदेड
           साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी
४.
*महाराष्ट्र टाइम्स* (संवाद पुरवणी )
ह्या संग्रहात समाविष्ट असलेली कविता कायम टवटवीत राहणारी अशी आहे. ती वैश्विक सत्याच्या आसपास घुटमळणारी त्यामुळे एकारलेली, कालबाह्य होणारी नाही.
                                - *बाबाराव मुसळे*
                             सुप्रसिद्ध कादंबरीकार
५.
*परिवर्तनाचा वाटसरू*
मोहन शिरसाट यांच्या कवितेत त्यांनी प्रतिमा आणि प्रतीकांची तोरण जागोजागी बांधली आहेत. त्यातून त्यांची कविता वाचकांना थेट भिड़ते. शिरसाट यांची कविता तत्वज्ञान, इतिहास, गाव, शहर, वर्ण, वर्ग,जात इत्यादिंना स्पर्शून अगदी प्रेमबंधही उलगडून पुढे जाते.
                             - *उर्मिला पवार*,मुंबई
                                   सुप्रसिद्ध लेखिका
६.
*लोकसत्ता* (लोकरंग पुरवणी)
साहित्य,समाज आणि संस्कृतीचे विविध स्तरावरील अनुभव मांडताना मोहनच्या कवितेतील समजुतदार सूर महत्वाचा वाटतो.
त्याची कविता बदलत्या सांस्कृतिक व सामाजिक जगण्याचा एक सर्वोत्तम कोलाज आहे.
              - *पी.विठ्ठल*,कवी व समीक्षक
               स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा    
                विद्यापीठ,नांदेड

७.
*दिव्य मराठी* (रसिक पुरवणी)
मोहनच्या कवितेला अांतरिक सद््भावनेची प्रगाढ जाण आहे, जी त्याला बुद्धांकडून मिळालेली आहे.
               - *आनंद विंगकर* ,कराड,सातारा
                    कवी आणि कादंबरीकार
८.
मोहनची कविता आक्रस्ताळी नाही, वरवरची नाही. आव्हान स्वीकारत आवाहन करणारी आहे. या कविता दलित कवितेला निश्चितच एक नवं रुप देतील. 
                                - *किरण येले* ,मुंबई
                       कवी कथाकार व नाटककार
९.
*सामना* (उत्सव पुरवणी)
साधी सरळ वाटणारी ही कविता अनेकदा विचारचक्राला गती देते तर कधी सामाजिक लेख्याजोख्याचे भान देते. कवीचे समकालीन भोवतालचे आकलन या कवितामधुन सहजच लक्षात येते. कविता उदंड वाढण्याच्या दिवसातील ही कविता असून देखील लक्षवेधी ठरली आहे ती तिच्यातील आत्मपरता आणि सामाजिकता यांच्यातील विलोभनीय अनुबंधामुळे.
                 - *डाॅ.कैलास दौंड* अहमदनगर
                      कवी ,कादंबरीकार  
१०.
'नाही फिरलो माघारी'ही आजच्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर  भोवताल आणि आपले पूर्वभान जपणारी कविता आहे.आपल्या परंपरेतील विद्रोही भान पुढे ठेवतांना आपल्या अस्तित्वाला जागत कवितेत माणसांबद्दल त्याच्या असतेपणाबद्दल बोलतांना दिसतो. त्यातून आलेली गतकातरता आजच्या वर्तमानाला कवेत घेत विचारांचा ऐवज सांभाळत पुढे जातांना समतेची दृष्टी स्वीकारतो.
                       - *दागो काळे* ,शेगाव
                            समीक्षक व कवी
११.
'नाही फिरलो माघारी' हा मोहन शिरसाट यांचा नव्या जीवन जाणिवांचा कवितासंग्रह चिंतनगर्भ ,मूल्यात्मक आशयाच्या उत्कट अभिव्यक्तीची कलात्मक साक्ष देणारा आहे.त्यांचे चिंतनसामर्थ्य गौरवास्पद आहे.
                   - *डाॅ.श्रीपाल सबनिस*
                अध्यक्ष ,८९ वे अखिल भारतीय
                   मराठी साहित्य संमेलन,पुणे

१२.
'नाही फिरलो माघारी' या काव्यसंग्रहात
आपण खूपदा नवी शब्द शलाका वापरताना दिसता...'चिंध्यांचे काळीज अंथरलेले' किंवा लक्तरांचे मुरमुरे..... अथवा  'कडव्या भिंतीचे
ग्लोबल माणसालाही पाश' अशी शब्दकळा कवितेला नवा नि वेगळा अर्थ प्रदान करते.
                     - *प्रेमानंद गज्वी*
    अध्यक्ष,अ.भा. मराठी नाट्य संमेलन,नागपूर

१३.
*नाही फिरलो माघारी* आपला कवितासंग्रह वेळ मिळेल तसा वाचला. शीर्षकाप्रमाणेच आपली कविताही मनस्वी आहे. वाकणार नाही, मोडणार नाही आता तिला कोणी रोखूही शकणार नाही. मानवी जीवनाचं भंगलेपण, मनाचं खुजेपण, काळीज पिळवटणारी दाहक वास्तवता सारं पचवून ती नवीन काही रुजवू पाहते आहे. खूप दिवसांनी चांगली कविता वाचल्याचं समाधान मिळालं.
                          - *माधव राजगुरू*
            माजी विशेषाधिकारी,बालभारती,पुणे
            संपादक - झंप्या(मुलांचे मासिक)

१४.
समकालीन वास्तवाचं चित्रण करणारी तुमची कविता एका वाचनात संपत नाही. असं असलं तरी आत्ताच संपूर्ण संग्रह वाचून संपवला. 
                         - *अनुपमा उजगरे*
                            सुप्रसिद्ध कवयित्री

१५.
मनाच्या विविध संवेदनांना
कागदावर ठेवताना तुमची लेखणी तुमची कविता मानवी संबंधावर टोकदार व परखडपणे भाष्य करते ही बाब मला खूप महत्वाची वाटली.कवितेतून व्यक्त होताना तुमची काव्यभाषा वाचकांशी सहज सरळ आणि प्रामाणिक संवाद साधते.
               - *प्रशांत असनारे*,अकोला
                नव्या पिढीचे लोकप्रिय कवी

१६.
*दै.लोकमत*,ठाणे (रविवार पुरवणी )
मोहनची कविता प्रखर उपहासाची कास धरते.त्याची कविता जखम न कता ममनावर घाव घालणारी आहे.त्याच्या कवितेला लयीचे भान आणि शब्दांची जाण आहे.
                    - *नारायण लाळे* ,मुंबई
                        सुप्रसिद्ध कवी
१७.
*भारतीय जनता* (आंबेडकरी नियतकालिक)
भाषासमृद्धी, काव्यतरलता, मुक्तछंद लयबद्धता, संयम, दांभिकतेविरोधी चीड, विवेकवादी, मानवतावादी,  परिवर्तनशील, बुद्धमार्गी जाणीव या वैशिष्ट्यांचा प्रवाहीपणा कवितासंग्रहाच्या पानापानावर स्थिरावलेला आहे. या वैशिष्ट्यांनी परिपुर्ण काव्यलेखनाचा उत्कृष्ट आविष्कार म्हणजे नाही फिरलो माघारी हा कवितासंग्रह.
                            *सुनील हेतकर ,सिंधदुर्ग*
                कवी व फुले-आंबेडकरी संशोधक
१८.
*दै.महानायक*,मुंबई
ग्रामीण वऱ्हाडी शब्दांचा साज आणि बाज हे मोहन शिरसाट यांच्या कवितेचं वेगळेपण पानोपानी दिसते. नवनव्या शब्द प्रतिमांना सामाजिक जाणीवांचे रुप दिल्यामुळे  त्यांची कविता एक वेगळ्याच उंचीवर पोहचल्याची साक्ष देते. रुढीने लादलेल्या मानवी शृंखला झुगारून देत इथल्या जातियवादी व्यवस्थेने केलेल्या शोषणांची यादीच  *नाही फिरलो माघारी* ह्या पहिल्याच कवितेत मांडताना कवी म्हणतात. 
                       - *डाॅ.प्रा.गंगाधर मेश्राम*
                 आंबेडकरी कवी व समीक्षक
१९.
*दै.पुण्यनगरी* (प्रहार पुरवणी )
साठोत्तरी दलित कवितेची भाषा ही परंपरेला नकार देणारी होती.विद्रोहाची धार बळकट करणारी होती.नवोदोत्तरी दलित कवितेची भाषा ही संवैधानिक नैतिकतेचे अनुसरण करणारी असली तरी आक्रमकपणे व्यक्त होते.हीच भाषा 'नाही फिरलो माघारी' या सग्रहाची आहे.
         - *प्रा.डाॅ.सत्यजित साळवे*,जळगाव
            कवी व स्तंभलेखक
२०.
*दै.एकमत* ,लातूर
नव्या अव्हानांंचा,ज्ञानाचा,समाजरचनेचा एकूणच नव्या पद्धतींंचा सहज सकारात्मक स्वीकार या भूमिकेत दिसतो.विदर्भातील काही शब्दकळा भाषेला गोडवा आणते,शिरसांंटांंची कविता मुक्तछंंदाची आहे पण तिला लय आहे.प्रतिमा नव्या संंवादी आहेत,भाषा भारदस्त,लालित्यपूर्ण तरी सहज ओघवती आहे.
                      - *नीलिमा कुलकर्णी,लातूर*
                         कवयित्री
२१.
*दै.स्वतंत्र भारत* धुळे
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने समाजातील दांभिकतेवर कवी शिरसाट कवितेतून प्रखर ओरखडे ओढतात.
                         *प्रा.डाॅ.विनोद उपरवट,धुळे*
                          कवी व समीक्षक
२२.
*अक्षरवैदर्भी* अमरावती
(वाङमयीन नियतकालिक)
या संग्रहात काही कविता या आत्मलक्षी असल्या तरी बहुतेक कविता हया समाजाभिमुख आहे. समाजातले ज्वलंत प्रश्न मांडणाऱ्या आहेत. प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत. तोच कविचा पिंड आहे.
                 - *प्रा.डाॅ.भाऊराव तनपुरे,वाशीम*
                     कवी व समीक्षक
२३.
*सर्वधारा*,अमरावती
( वाङमयीन नियतकालिक)
व्यवस्थेला प्रश्न विचारणारी ही कविता आंबेडकरी कवितेच्या विद्रोहात्मक रूपाला अवतीर्ण करताना दिसते.सोबतच समकालात व्यवस्थेचा बुरखा फाडणार्‍यांची कैफियत व सत्तेची गुर्मी असणार्‍यांचे वर्तन यालाही उजागर करते.कवीची आकलन व निरीक्षणक्षमता ही एकांगी नाही तर ती चौफेर आहे.
               *प्रा.डाॅ.भास्कर पाटील* ,अकोला
       कवी व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक
२४.
*दै.विश्वपथ*
कवी आपल्या कवितेतून गावाकडील कष्टकरी मित्राचे राबलेले हात हातात घेऊन द्रवतो.कवी श्रमिक-कष्टकर्‍यांचे जग आपल्या लेखनीतून पोहचवतो.उगीच शब्दबंबाळपणा नाही की आक्षेपार्ह भाषा नाही .जे लिहिलं ते अंतःकरणातून लिहिलं.
                            - *रवींद्र साळवे,बुलढाणा*
                                कवी
२५.
*दै.नवशक्ती,मुंबई* (ऐसी अक्षरे रसिके)
'नाही फिरलो माघारी' या कवितांतून केवळ समाजातील उद्वेगच दिसून येत नाही किंवा हताशपणा नाही जाणवत तर यामधून समाजातील परिवर्तनाचा एक सकारात्मक आशावाद आपल्यासमोर येतो.त्यामुळे हा कवितासंग्रह उत्कृष्ट झालेला आहे.प्रत्येकाने एकदा तरी वाचावा .
                           - *रजनी नाफडे,मुंबई*
                               कवयित्री
२६.
जळजळित वास्तवावर आत्यंतिक संयमाने भाष्य करणे हे शिरसाट यांच्या कवितेचं वैशिष्ट्यं ठरलं आहे.कवीचा विद्रोह दमनशक्तीविरूद्ध आहे.म्हणूनच तो जिथे जिथे वंचिताची दुरावस्था होत आहे .तिथल्या समस्त उपेक्षितांची व्यथा दुःख वेदनेसह संवेदनशील नजरेनं अंकित करतो.तद्वतच कवितेच्या अनवट वाटेनं चालत असताना नवी प्रतिमासृष्टी देखिल कवीने साकारली आहे.
                    - *डाॅ.प्रा.अशोक इंगळे*
                      मराठी विभाग प्रमुख
                जिजामाता महाविद्यालय ,बुलढाणा
२७.
*पंचधारा* -जाने तू मार्च२०१९
( वाङमयीन नियतकालिक ) *हैद्राबाद*
पारंपरिक शारीर प्रतिमांपेक्षा मोहन शिरसाट यांच्या देहनिष्ठ प्रतिमा वेगळ्या आहेत.मराठी कवितेत प्राय: प्रेम,प्रणय, श्रृंगार, सौंदर्य इत्यादी रोमॅंटिक भावना व्यक्त करण्यासाठी ओठ, डोळे,गाल,नाक,वक्ष इत्यादी शारिर अवयवांचा उल्लेख केला जातो किंवा विद्रोही कवितेत आढळणाऱ्या शारीर प्रतिमा त्वेष,नकार,विद्रोह आदी नकारात्मक भावना तीव्र स्वरुपात व्यक्त करण्यासाठी योजलेल्या आढळतात.एक प्रकारचा ठाम, सामर्थ्यनिगडीत भाव मोहन शिरसाट त्यांच्या देहनिष्ठ प्रतिमांच्या माध्यमातून व्यक्त करतात.त्यामुळे या प्रतिमांना शारीरिक/दैहिक प्रतिमा न संबोधता देहनिष्ठ प्रतिमा असे संबोधणे उचित ठरते.
                             - *विद्या ठाकुर बयास*
                              कवयित्री व कथाकार
                          शिरूर ताजबंद जि.लातूर

२८.
*अक्षरगाथा* -एप्रिल २०१९
(वाङमयीन नियतकालिक,*नांदेड*)
'नाही फिरलो माघारी' या संग्रहातील भाषिक सौंदर्य,चिंतन,आशयसंपन्नता,मुक्तालय,काव्यतरलता इत्यादींनी सदर संग्रह अधिक प्रगल्भ झाला आहे.श्वासाइतकंच त्याचं मूल्य वाटतं.दिशाहिनांना दिशादर्शक बनवतं.प्रेरकता हे मूलस्थानी असल्यामुळे कविता थेट हृदयपटलावर स्थिरावते.
                        - *प्रा.सुभाष किन्होळकर*
                           मोताळा,जि.बुलढाणा
२९.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा साहित्यविचार कवितेतून अविष्कृत करणारे कवी मोहन शिरसाट यांच्या कवितासंग्रहाचे वेगळेपण म्हणजे आंबेडकरी सर्जनशीलतेला अभिप्रेत असलेली उदात्त जीवनमूल्य आणि सांस्कृतिक मूल्य अविष्कृत करणारी सम्यक कविता प्रभावीपणे आली आहे.
               - *डाॅ.प्रा. सारिपुत्त तुपेरे*,सोलापूर
                   समीक्षक व कवी
३०.
मी स्वतः आजवर स्त्रीवादी भूमिकेतून अनेक कविता लिहिल्या आहेत किंबहुना अनेक स्त्रियांच्याच नव्हे पुरुषांच्या सुद्धा अगदी जहाल स्त्रीवादी कविता वाचलेल्या आहेत पण मनोहर शिरसाट यांची हवी ग तुझ्याकडून माफी ही कविता वाचतांना स्त्रीवादाची परस्परसंवादाची प्रक्रिया किती आवश्यक आहे याची जाणीव मनाला स्पर्शून जाते.
                        डाॅ.प्रा.सुनीता बोर्डे ,सांगली
                         कवयित्री

Monday, 27 May 2019

कवितासंग्रह




online उपलब्ध आहे 'नाही फिरलो माघारी' (ग्रंथाली प्रकाशन,मुंबई)हा माझा कवितासंग्रह खालील लिंकवर...
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5174065189722810531?BookName=Nahi-Firlo-Maghari

भेट

भेटीने उमलल्या कळ्या
उठले तरंग
पंचरंगी
रंगीबेरंगी उडती पतंग
आंगोपांगी

सुसंगाचे वेगळ्या ढंगांचे
जिणे आपले कलावंतांचे
निळ्या नभातल्या
नितळ भावना जागवायचे

भेटीने उमलल्या कळ्या
झळाळल्या फुलझड्या
सुगंधित ह्या
जिव्हाळ्याच्या पाकळ्या

भेटीचा दिला मला मान
हा सन्मान
छातीवर मिरवीन हा अभिमान

भेट नव्हती पहिली
इतके सहज शब्द
अलगद आले ओठांत
कलात्मकता अंतर्बाह्य
शब्दांची ही कलाकुसर
तुझ्या परीघात

तू प्रज्ञामुखी
सर्जनसुखी
दुःखाची सखी
वेदनेला नाहीस अनोळखी

तुझ्या भेटीत
मी भारलो
भरलो शिगोशीग

भारावून गेलो
भरजरी सहवासात
भरदार भक्कम झालो...

       -मोहन शिरसाट ,वाशीम
      mohan.shirsat@gmail.com