काळजातली कळी
खर्या अर्थाने
ती आपली पहिलीच भेट
कसं काय जोडले गेले हे संवादाचे नेट ?
पहिलं बघणं अन
तुझं सहज संवादाचं सूत्र सांधणं
अजुनही टवटवीत मनात
झंकार झनकला अवघ्या तनात
कलदार अन अलवार तुझे शब्द
पुढ्यात उभी अशी चमकदार
मी खरंच मुग्ध
उंच अन सडपातळ बांधा
नजरेत भरावी अशी रुपया बंदा !
टक लावूनच मी त्या दिवशी
मैत्रीण माझ्या कल्पनेतली जशी
हास्यगंधात मधाळ फार
लवचिक तुझ्या रूपाला धार
ओढ वाटणं आतून
नजरेत भरुन, मनात उरणं
काळजातली कळी स्नेहील उमलणं
पहिल्याच भेटीत असतं काय हो
अशी मनं जुळणं ?
असणं आकंठ आसक्त
म्हणूनच मी तुझ्याशी अभिव्यक्त
एकमेकांसाठी आस्था जागवणं
शब्दाशब्दांतून केशर सांडणं
सहजच संवादाचे पाऊल पुढे पडणं
हृदयीचे अंगण चांदण्याने शिंपणं
यालाच म्हणतात का मनं जुळणं ?
खरंच आतून आपलेपण
आसूस कधीचा हा भेटीचा क्षण
आदिम अधिक हा आपला जोड
कुंठित नकोय प्राणातली ओढ
मनातली गाठ सैल सोड
जुळलेल्या तारा प्रवाहातच गोड
-मोहन शिरसाट