माझ्या सहा कविता
❄️❄️❄️❄️❄️
१
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
असं चित्र जे बसत नाही
कोणत्याही एकाच फ्रेममध्ये..
असा झरा
जो निखळ वाहणारा
हृदयापासून हृदयापर्यंत...
असं सत्त्व
जे वाहणारं झाडाच्या मुळांतून
उंच माथ्यापर्यंत ..
अशी लहर
जी अथांग सागरातून लाट बनून
विसावणारी किनार्यावर ..
असा मकरंद
ज्यासाठी फुलानं आपलं सारं आयुष्य
सत्कारणी लावलेलं...
असा मोती
जो आयस्टरचं दुःख
आपल्या पोटात असुनही चमकतो
प्रेम म्हणजे
असा श्वास
जो चराचरांमध्ये प्राण
तेवत ठेवतो अविरत..
-मोहन शिरसाट ,वाशीम
mohan.shirsat@gmail.com
भ्रमणभाष -9421051823
२
आठवणींचा आठवला शेला
कालचा दिवस बीझी गेला
तुझ्या आठवणींचा आठवला शेला
जाग आली सकाळी सकाळी
आठवणीच्या गजराने
तन मन झाले जागे
आठवणीच्या किलबिलाटाने
वाॅकींगला सरत्या रस्त्याला
घेतले आठवणीच्या कवेत
आठवणीतच श्वासउच्छासाचा सराव
पहाटेच्या मस्त हवेत .
गप्पांमध्ये नव्हते लक्ष
आठवणींचं वारं भरताना
आठवणींचा ज्वर चढाच
घराच्या पायर्या चढताना
आठवणींच्या गाठी उकलल्या
बुटाची लेस सोडताना .
चहाची चव भारीच
तंद्रीत भुरके घेताना
आठवणी आठवणीतच
नुसताच आठवण काढत
अंघोळ न करताच बसलो
आठवणींची समाधी लावत .
आठवणींच्या साबणाचा फेस
आला आतून शरीरभर
आठवणीतच फ्रेश झालो
ताजेतवाने वाटले मनभर
दारातले वर्तमानपत्र
अलगद आले हातात
आठवणींच्याच हरेक
बातम्या हरेक पानांत
मंद स्मित हसर्या बोलात
आठवण पुढे सरकली
वार्याच्या सहवासात
आठवणींची पानं टवटवली
थोडी टंगळ मंगळ करताना
सरकली उगीच वेळ पुढे
गाणी गोष्टीत गुंततानाही
जीव असा तुझ्यातच ओढे
दिवसभर तुझीच आठवण
चघळत होतो मनात
विरघळतही नव्हती
सहज लगेच क्षणात
आठवणींची भर भरता
हळूच येते सरीवर सर
संकोचणार्या झाडाला
तुझ्या आठवणींची भर
आठवणी आठवणीतच
दिस सरला रात्र उरली
आठवणीची झालर मात्र
मंद मंद झुलतच राहिली
आठवणींना नाही वास
जातीचा-धर्माचा वा प्रदेशाचा
सुवासच आहे चित्तात
आठवणींच्या साग्र संगीताचा
ही आठवण आहे
शाळेतल्या किशोरावस्थेची
तुझ्या आकर्षणाच्या नादात
सुस्ताळलेपण जाऊन आलेल्या हुशारीची
कालचा दिवस बीझी गेला
तुझ्या आठवणींचा आठवला शेला
- मोहन शिरसाट
आय.यु.डी.पी.काॅलनी ,वाशीम 444505
mohan.shirsat@gmail.com
३
तू घडी विवेकाची
तुझ्या बालपणाची घडी बिघडलीय
संसाराच्या ओझ्याखाली
अवखळलंय तारूण्याचं सळसळणं
इच्छांचे सोनेरी किरणं अडवले गेलेत ह्या समाजव्यवस्थेच्या पडद्यांनी
मन चंचल बनवावं लागलं
अचल भावनेत अडखळत
बंधनांचे काटे बोचत राहिले सतत
पण या अडथड्यातून
तुझी महत्वाकांक्षा आली कवच चिरून
तुझे आकाश मागितले तू जोरकसपणे
तुझे आकांक्षा चेतवल्या तू ताकदीने
तुझे तुला पेटवून घेतले तू अंतर्बाह्य
तशी मिळविलीस तुझी तू स्पंदणे
स्वतःचा श्वास स्वतः घेत राहिलीस
स्वतःचं सत्त्व स्वतःच मिळवलं
करवून घेतलंस स्वतःच्या माणसांना आपलंस
भोवतालच्यांना पटवून
फुलविलास पिसारा तू ह्या ज्ञानदेही
आणि झालीस प्रज्ञामयी
तू घडी आहेस सतत टिकटिकणारी
थांबणे तुझ्या स्वभावात नाहीय
चालण्याची ऊर्जा तुझी तूच होते
म्हणून तुला हवेय तुरंत सगळे
तात्काळ हवा जबाब
तुझ्या नसानसांतल्या घड्याळी काट्यांना
नसते उसंत थांबायला
तुला हवं ते मिळवायला
तू असतेस अधिर
बधिर नसतातच तुझी गात्र
सतत जागं असते भान
असं जगणंच तुझी आहे शान
पण आता ही ऊर्जा
लावावी सर्जनाच्या ठायी
म्हणून विवेकाचा गजर असू दे तुझ्या पायी.
- मोहन शिरसाट
आय.यु.डी.पी.काॅलनी ,वाशीम 444505
mohan.shirsat@gmail.com
४
मज आवडतो
मज आवडतो
समुद्राचा अथांगपणा
वाळूचा मऊशारपणा
लाटांचा अवखळपणा
पावसाचा अल्लडपणा
भक्कम झाडांचं डोलणं
हिरव्या रानात रमणं
ओल्या मातीचा गंध
हास्य गालातलं मंद
स्निग्ध बोलाची साय
पाऊसधारातला गरम चाय
अजून काय आवडते सांगू तुला ?
शब्द मधाची चव ताजी
वल्हव मनाची नाव राजी
फुलांचं फुलणं
नभाला भीडणं
नदीशी बोलणं
पक्षांचं विहरणं
मनोमन मनात स्वतःशीच झगडणं
माणूसकी जगवणार्यांना जीवापाड जपणं
भोवतालातल्या भिन्नांना
सकारात स्वीकारणं
अशीच आवड सांगत जाऊ किती
पराभवाला सांगू 'जिद्द हाय जीती !'
आवडते मला......
-मोहन शिरसाट,वाशीम
mohan.shirsat@gmail.com
भ्रमणभाष-9421051823
५
पुरूष म्हणून केलेल्या अन्यायाची कबुली .
कबुल मला ,
अधून मधून जागा होतो माझ्यातला पुरूष .
कळतही नाही मला की ,मी पुरुष म्हणून
तुझे मनगट कधी पिरगाळले म्हणून !
पाठीवर थाप क्कचित पडते तुझ्या ,
पण पाठीवर वळ उठण्यासच
कारणीभूत ठरतो मी .
चटक्यांचीच भाषा तुला कळतेय
असंच वाटते मला नेहमी.
रटन्या घटन्याच्या तुझ्या आयुष्यात
रट्टेच हवेत तुला, त्याशिवाय बस्सर नाही जात
तुझी बाईची जात .
बाई वरचढ म्हणजे
तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या.
तू बाईमाणूस असूनही तुझ्यातला
'माणूस' दडवलाय मी स्वतःकडे वळवलेल्या चार बोटात.
तुलाही मन असते हे माझ्या ध्यानी मनीच नसते .
तुलाही भावना असतात
हे मला कधी भावतच नाही .
तुझं ममत्व महत्वाचं नसून
तू मांडलिकच असावी माझ्या मांडीखालची.
माझी नजर जरी भिरभिरली सगळीकडे
तरी तुझी नजर माझ्याच देहावर खिळवून रहावी ,
असाच खेळ खेळतो तुझ्याशी बारहम्मेस .
ठिबकत राहतो सत्तेचा माज माझ्या आतून.
आटतच नाही माझा पुरूषी बाज अंगातून.
पिडागुहेतले नुसते शिल्प बनवून शो -पिस
म्हणूनच सजवलं धजवलं तुला .
उंबरठ्याबाहेर जाणारे बाहू कापले जरी असले
तरी दिवाणखाण्यात खांद्याला खांदा भीडवून
नक्षीदार फ्रेम हवी तुझ्यासवे .
खरंच ग ,
हा काळाचा पडदा बाजूला केला तर
अनंत अंधारच आहे तुझ्यावर आजपावेतो .
म्हणूनच ही जाहीर कबुली देतोय
तुझ्या समक्ष साक्ष ठेऊन
'पुरूष म्हणून केलेल्या अन्यायाची !
( नाही फिरलो माघारी' या कवितासंग्रहातून )
-मोहन शिरसाट ,वाशीम
mohan.shirsat@gmail.com
भ्रमणभाष -9421051823
६.
#चारोळ्या
१
नाकात नथनी
गळ्यात सोन्याची माळ
मनात मोहिनी
लावण्याचा उठला जाळ ।
२
मैत्री जुळली
साय दुधाची जशी
मधाळ खुशी
३
फुलांचे सृजन
मनीचे गुंजन
साद घाली मला ।
पाकळ्या कांचन
हृदयी साजन
हाक देई मला ।
४
हृदयी कळी म्हणाली
संगाचे धुमारे जपावे ।
मनाशी नातं जोडून
स्नेहाचे अंकुर जपावे ।
५
आपण राहू मनोमनी
समीप एकमेका ।
आपण साहू पानोपानी
सांभाळू जनलोका ।
६
डोई भार सतत
तोल सांभाळताना ।
मी ग लई गुंतले
नात्यांना जपताना ।
७
अशीच वीज अमोल
अक्षरात नाचावी
शब्दांत मळावी
भिनून
मुरावी
चमकत लकाकावी
अंतरात खोल ओल
✨✨✨✨✨